“वैज्ञानिक दृष्टीकोन दिना”ची कुळकथा
वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसाराचे उल्लेखनीय भरीव कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी "राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन" म्हणून अंमलात आणायचा असे ठरले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी झटत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी असे कार्य करणारे हजारो लोक महाराष्ट्रात तयार केले.
![]() |
Original Photo From BBC News |
२०१८ साली २८ फेब्रुवारीला “राष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा करण्यात आला. विज्ञान दिवस म्हणजे विज्ञानाचे प्रयोग मांडणे, विज्ञानाची प्रगती सांगणे अशा प्रकारे सामान्यतः सगळीकडे तो साजरा केला जातो. त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असलेल्या गोष्टी, उपचार त्या कार्यक्रमात केले जातात असेही आढळून आले. एका प्रतिथयश शाळेत अंधश्रद्धाळू कर्मकांडासह हा विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्याची बातमी फोटोसह "अंधश्रद्धा निर्मुलन" हे बिरूद लावलेल्या एका ग्रुपवर आयोजकांनी टाकली.
त्यावर माझे आक्षेप मी स्पष्टपणे मांडले. परंतु त्यातील कर्मकांडाचे व अवैज्ञानिक उपचारांचे समर्थन स्युडो-सायंटिफिक कारणे देऊन आयोजक मंडळीतर्फे सुरु होते. चर्चेत ते सतत निरुत्तर होत होते व त्यामुळे माझे युक्तिवाद मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण असले युक्तिवाद येथे करायचे नाही अशी ताकीद देण्यात आली. अखेरीस मला त्या ग्रुपमधून काढून टाकण्यात आले.
त्यावेळी - आज आपल्या देशाला "विज्ञान-दिन" पेक्षा "वैज्ञानिक दृष्टीकोन दिन" याची जास्त गरज आहे.- हे प्रकर्षाने पुन्हा जाणवले. मात्र विज्ञान दिन यातच "वैज्ञानिक दृष्टीकोन येतो" असे ग्रुपमधील लोकांचे म्हणणे होते. “वैज्ञानिक दृष्टीकोन” हा मानव्य शास्त्रे (Social Studies) या ज्ञान-शाखेचा भाग आहे व विज्ञानात आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात आपण त्याचा उपयोग करीत असतो, हेही अनेकांना ठाऊक नाही, असे दिसून आले. आहार, आरोग्य, व्यवसाय, विज्ञान, विविध क्षेत्रातील संशोधन, पर्यावरण, कचरा-व्यवस्थापन, शिक्षण, सामाजिक एकात्मता, बालसंगोपन, सामाजिक सुरक्षा, वाहतूक, सहजीवन इत्यादी क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टीकोन अत्यंत आवश्यक आहे. ज्या ज्या क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जितका अभाव असेल तितके नुकसान आपल्याला व समाजाला सहन करावे लागते.
त्या वेळी मला "वैज्ञानिक दृष्टीकोन दिन" याची गरज अधिकच तीव्रतेने भासू लागली. त्याच दिवशी त्याविषयी संक्षिप्त पण ठळक पोस्ट तयार करून फेसबुक, whatsapp इत्यादीवरून मोठ्या प्रमाणात फिरवली. विज्ञान-दिन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन दिन यामधील फरकावर चर्चा होऊ लागली. त्याला अनेक विवेकी लोकांनी दाद दिली. ती कल्पना अनेकांना आवडली. “वैज्ञानिक दृष्टीकोन दिन” स्वतंत्रपणे साजरा व्हायला पाहिजे, अशी चर्चा सुरु झाली.
All India People’s Science Network (AIPSN) या संस्थेने व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या प्रकरणी पुढाकार घेतला. त्यातून वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसाराचे उल्लेखनीय भरीव कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी "राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन" म्हणून अंमलात आणायचा असे ठरवले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी झटत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी असे कार्य करणारे हजारो लोक महाराष्ट्रात तयार केले. तथापि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रकाशामुळे ज्यांच्या हितसंबंधांना बाधा पोचते, ज्यांची अंधश्रद्धेची दुकाने बंद होतात अशा समाजघातकी शक्तींनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे निघृण खून केला.
त्यांच्या खुनानंतर वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसाराचे कार्य बंद पडेल ही खुनी दहशतवाद्यांची अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही. उलट हजारो लोकांनी डॉ. दाभोलाकरांप्रमाणे स्वतःला या कार्यात झोकून देऊन ही चळवळ मोठ्या प्रमाणात वाढवत नेली. त्यांच्यानंतर त्यांची मुले मुक्ता व हमीद यांनीही स्वतःला वैज्ञानिक दृष्टीकोन पसरवण्याच्या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. मअनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील सुद्धा रात्रंदिवस नव-समाज निर्मितीसाठी झटत आहेत.
आता २० ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन म्हणून भारतभर साजरा करण्यात येत आहे. २०१८ मध्ये पहिला वैज्ञानिक दृष्टीकोन दिन साजरा करण्यात आला. या वर्षी दुसरा वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने भारतभर विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यातून वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचते आहे. आपण दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस "राष्ट्रीय विज्ञान दिवस" व २० ऑगस्ट हा दिवस " राष्ट्रीय वैज्ञानिक दिवस" म्हणून सर्वत्र पाळू या.
= धनंजय आदित्य