ही जमीन आधी कोणाची होती?

Mother Earth Image from Wikimedia CCA

एक राज्य होते. तिथे एक राजा राज्य करीत होता. राज्यात सर्व आलबेल होते. सर्व जाती-धर्माचे लोक एक दुसऱ्याशी मिळून मिसळून राहत असायचे.

एके दिवशी दरबार भरलेला असताना एक अहमद नावाचा माणूस राजाकडे तक्रार घेऊन आला. तो म्हणाला,” राजेसाहेब, विक्टर नावाचा एक माणूस माझे घर व भोवतालची शेतजमीन बळकावून राहतो आहे. तरी राजे साहेबांनी माझे ते घर व जमीन मला देऊन मला न्याय मिळवून द्यावा.”

राजाने त्या विक्टर नावाच्या माणसाला लागलीच बोलावणे धाडले. विक्टर राजदरबारात आल्यानंतर राजाने त्याला विचारले, “ हे सभ्य माणसा, तू अहमद नावाच्या माणसाचे घर बळकावले असा त्याचा आरोप आहे. हा आरोप तुला मान्य आहे का?”

विक्टर म्हणाला, “ नाही राजेसाहेब. हे घर सुमारे दीडशे वर्षे आमच्या पूर्वजांच्या ताब्यात आहे. वंशपरंपरागत आम्ही या घरात राहत आहोत. राजसाहेब, आमच्या पूर्वजांनी हे घर व जमीन बळकावले नाही, तर रीतसरपणे विकत घेतले होते. त्यामुळे आमच्या पूर्वजांची ही संपत्ती झाली.”

तर राजा म्हणाला, “ हे घर विकत घेतले होते, याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे?”

विक्टर म्हणाला, “ हे घर विकत घेतल्याची कागदपत्रे किंवा पुरावा आमच्याकडे नाही. पण दीडशे वर्षापासून आमचे पूर्वज या जागेवरील घरी राहत असल्याच्या नोंदी आहेत.”

अहमद म्हणाला, “ राजसाहेब, त्यापूर्वी आमचे पूर्वज या जागेवर राहत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सुमारे २०० वर्षांपूर्वी आमचे पूर्वज येथे राहत होते असे त्या भागात आलेल्या एका प्रवाशांने लिहून ठेवले आहे.”

राजाने विक्टरला याबाबतीत विचारले. त्याने ते खरे असल्याचे सांगितले. त्यावर राजा म्हणाला, “ हे घर मूळचे अहमदच्या वंशजाचे आहे. म्हणून विक्टरने त्या घराचा ताबा अहमदला द्यावा.”

अहमद त्या घरामध्ये राजाच्या सूचनेनुसार राहू लागला. काही दिवसांनी तेथे राजाराव नावाचा माणूस आला. त्याने त्या घरावर स्वतःचा ताबा सांगितला. तो राजाला म्हणाला, “ राजेसाहेब या ठिकाणी आमचे पूर्वज तीनशे वर्षांपूर्वी राहत होते. त्या संबंधीचा ४०० वर्षांपूर्वीचा शिलालेख सुद्धा सापडला आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला देण्यात यावी.” राजाने पुरावे पाहून राजारावला त्या जागेचा व घराचा ताबा दिला. राजाच्या सूचनेनुसार राजाराव त्या घरात राहू लागला. स्वतःच्या संस्कृती प्रमाणे त्याने काही नवीन बांधकामही केले. 

काही वर्षांनी संघमित्र नावाचा एक माणूस आला. तो राजाला म्हणाला, “ राजेसाहेब, या ठिकाणी पूर्वी अनेक वर्षे आमचे पूर्वज राहत होते. राजाराम यांनी जे बांधकाम केले, त्याच्यामध्ये आमच्या पूर्वजांच्या घराचे अवशेष वापरले. पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी काही सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये आमच्या पूर्वजांच्या घराचे अवशेष सापडले. तसेच या प्रदेशाच्या तेव्हाच्या राजाने येथील जमीन आमच्या पूर्वजांना अधिकृतरित्या दिल्याचे उल्लेख त्या त्या वेळच्या ग्रंथांमध्ये सापडून येतात. तरी राजेसाहेबांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून सदर जागा आम्हाला द्यावी.” राजाने एक संशोधन समिती नेमली. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी या जागेवर संघमित्र यांच्या पूर्वजांचे घर होते, हे सिद्ध झाले. त्यामुळे राजाने त्या घराचा व जागेचा ताबा संघमित्र यांना दिला.

काही दिवसांनी राजाकडे काही आदिवासी लोक आले व ते म्हणाले, “ महाराज, या जागेवर अनेक वर्षापासून आमचे पूर्वज राहत होते. ते स्थलांतरित शेती करून उपजीविका करायचे. असेच एका स्थलांतराच्या वेळी आमचे पूर्वज दुसरीकडची शेती पार पडल्यावर या ठिकाणी आले. तेव्हा येथे दुसऱ्याच कोणत्यातरी लोकांचे घर आढळले. ते संघमित्र यांचे पूर्वज होते, हे आम्हाला मध्येच केव्हातरी कळले. परंतु ती जागा मूळची आमच्या पूर्वजांची होती, म्हणून ती जागा आम्हाला देण्यात यावी. राजाने पुन्हा एक संशोधन समिती नेमली. या जागेवर खरोखरच आदिवासी लोकांची वहिवाट होती, हे सिद्ध झाले. राजाने ती जागा आदिवासींना देण्याचा आदेश दिला.

काही महिन्यांनी जंगलाचा राजा सिंह व त्याच्या मंत्रिमंडळातील इतर प्राणी राजाच्या दरबारात आले. सिंह राजाला म्हणाला, “ महाराज, खूप खूप वर्षांपूर्वी या जागेवर सर्वत्र घनदाट जंगल, नद्या होत्या. तेथे आम्ही सर्व प्राणी आपापल्या गुणधर्माप्रमाणे नांदत होतो. पण मध्येच तेथे काही प्राणी आले व स्वतःचा मालकी हक्क सांगू लागले.” यावर राजाने एक मोठा दरबार भरवला. संबंधित संबंधित लोकांना, प्राण्यांना व सर्व जीवांना आमंत्रणे पाठवली गेली. दरबार भरला. वादग्रस्त जागा ही मूळची नक्की कोणाची यावर बरीच चर्चा व वादविवाद झाले.

या ठिकाणी सर्वात आधी जंगल व तेथील प्राण्यांची मालकी होती. आदिवासी पण तेथील झाडे व प्राणी यांच्याशी मिळून मिसळून राहत होते. अमुक एका जागेवर ते मालकी सांगत नव्हते. - असा दरबाराचा निष्कर्ष निघाला. त्यामुळे राजे साहेबांनी त्या जागेवर जंगलाची पुनःस्थापना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तेथे आलेल्या सर्वांनी आपापली सोय इतर ठिकाणी करावी, असे आदेश दिले.

काही वर्षांनी राजाच्या दरबारात धरतीमाता एका महिलेचे रूप घेऊन हजर झाली. तिचे सर्वांग ओरखडे व अनेक जखमांनी ग्रासलेले होते.  ती म्हणाली, “ राजा, या जागेवर जंगलांच्या आधी दगडाळ परिसर होता. त्याआधी लाव्हारस इकडून तिकडे फिरत होता. त्याआधी विविध उष्ण वायूंचे प्रवाह इकडून तिकडे घों घों आवाज करीत फिरत होते. त्यावेळी येथे ना कोणाचे घर होते, ना कोणाचे शेत होते. मालकी सांगायला कोणी माणूसही नव्हता. या जागेवर सर्वात आधी कोण होता, याचे उत्तर असे आहे.”

धरती माता पुढे सांगू लागली, “माणसांनी माझ्यावर म्हणजे धरणीमातेवर आडव्या तिडव्या कृत्रिम रेषा काढल्या आणि त्यावरून स्वतःचे कृत्रिम अधिकार तयार केले. त्या कृत्रिम अधिकारासाठी हाणामाऱ्या, भांडणे, लढाया, कोर्टकचेऱ्या केल्या. आणि राजा तू या सर्वांचे ऐकून त्यांचे लांगुलचालन करू लागलास. तू तरी काय करणार? तूही येथील व्यवस्थेचा वरच्या स्तरावरील एक भागच आहेस ना! ही भांडणे थांबवण्यासाठी येथील व्यवस्था (System) बदलवणे आवश्यक आहे. त्या बदलाचे कुणाला स्वप्नही पडत नाही, ही खरी दुरावस्था आहे.” एवढं बोलून धरती माता आली तशी निघून गेली. दरबारातील राजासहित सर्वजण एका वेगळ्याच विचारात गढून गेले.

अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

(टीप - ही काल्पानिक कथा असून तिचा कोणत्याही राज्य, देश, धर्म व व्यक्ती यांच्याशी संबंध नाही.)

- धनंजय आदित्य 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

अमेझॉन चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन': पाहायलाच हवा असा अप्रतिम चित्रपट

बाबा वेंगा यांच्या खोट्या भविष्यवाण्या