मार्क्सवाद आणि अस्मितेचे राजकारण

अभिनव सिन्हा 

‘सायन्स ऑफ रिव्होल्यूशन’ या अभ्यास गटाच्या वतीने, अभिनव सिन्हा यांचे लखनौ येथे २६ ऑक्टोबर रोजी ‘मार्क्सवाद आणि अस्मितेचे राजकारण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अभिनव सिन्हा हे फॅसिझम, जातीचा प्रश्न, अस्मिता प्रश्न, कामगार चळवळ, राजकीय अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर दीर्घकाळ लेखन करत आहेत आणि देशात आणि परदेशात या विषयावर अनेक व्याख्याने दिली आहेत. अलीकडेच त्यांचे ‘इन द व्हॅली ऑफ हिस्टोरिकल टाईम’ हे पुस्तक ब्रिल नेदरलँड्समधून प्रकाशित झाले आहे, ते जागतिकीकरणाच्या युगात कामगार चळवळीच्या नवीन स्वरूपांवर लक्ष केंद्रित करते. याशिवाय त्यांच्या पुस्तकांमध्ये ‘फासीवाद क्या है ओर उस से कैसे लड़े?, ‘सबव्हर्सिव्ह इंटरव्हेंशन्स’, ‘फॉर अ प्रोलेतारियन लाइन’, ‘‘ऑन दि कास्ट क्वेश्चन: टुवर्ड्स ए मार्क्सिस्ट अण्डरस्टैंण्डिंग’, ‘टॉयलर ऑफ कॅपिटल’ इत्यादींचा समावेश आहे. ते 'मजदूर बिगुल' या वृत्तपत्राचे संपादकही आहेत.

=== भाषणाचा सारांश ===

अस्मितेच्या राजकारणाची वैचारिक मुळे आणि गेल्या चार-पाच दशकांत जगभरात पसरलेले त्याचे परिणाम तसेच सामाजिक परिवर्तनाच्या राजकारणावर त्याचे होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. आज अनेक “मार्क्सवादी” वर्गीय विश्लेषण सोडून अस्मितावादाला शरण गेले आहेत.

अस्मितेच्या राजकारणाची सुरुवात 1980 च्या दशकात दिसून येते. त्याच्या केंद्रस्थानी जात, लिंग, धार्मिक पंथ, वंश, वांशिकता इत्यादी सामाजिक श्रेणींनी बनलेली ओळख (Identity) आहे. परंतु ती सामूहिक घटना म्हणून कोणत्याही एका अस्मितेबद्दल बोलत नाही तर अनेक खंडित अस्मितांवर जोर देते. वर्गीय समाजातील प्रत्येक माणसाची बहुआयामी ओळख असते. आयडेंटिटी पॉलिटिक्स या सर्व भिन्न ओळखींना ठळकपणे दाखवते आणि 'वर्ग अस्मितेचा' उल्लेखही करत नाही.

1980 आणि 1990 च्या दशकात जागतिकीकरणाच्या सुरुवातीसह, जिथे जिथे नवउदार आर्थिक धोरणे लागू झाली, तिथे लोक मोठ्या प्रमाणावर उखडले गेले, बेरोजगारी वेगाने वाढली आणि लोकांमध्ये असंतोष पसरला. अशा परिस्थितीत, लोकांमध्ये वाढणारा संताप आणि वाढत्या जनआंदोलनांना निष्क्रिय करण्यासाठी आणि कमकुवत करण्यासाठी सत्ताधारी वर्गाने अनेक पद्धती वापरल्या. तीक्ष्ण (धारदार) स्वरूपातील वर्गीय विरोधाभास धूसर करण्यासाठी अस्मितावादी राजकारण हे एक प्रभावी वैचारिक साधन म्हणून काम करते. वरवर पाहता ते अगदीच मूलगामी गोष्टी बोलतात, पण प्रत्यक्षात अस्मितेच्या राजकारणाने वर्ग अस्मिता (Class Identity) लपविण्याचा प्रयत्न केला आहे, “मागील” अस्मितेबद्दल बोलून आणि कामगार वर्गाच्या वर्ग-चळवळींना गोंधळात टाकण्याचा आणि विघटन करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्गसंघर्षाच्या मार्क्सवादी सिद्धांताविरुद्ध उभा असलेला आंतरविभाजन आणि अस्मितेच्या राजकारणाचा सिद्धांत अमेरिकन अकादमीच्या अति-प्रतिक्रियावादी थिंक टँकने तयार केला आणि वेगवेगळ्या स्वरूपात भारत आणि आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देश त्याची प्रयोगशाळा बनले.

तथाकथित “नवीन सामाजिक चळवळी” नावच सूचित करते की प्रकरण गोंधळलेले आहे. प्रत्येक चळवळ सामाजिक (Social) असते, जैविक (Biological) चळवळ नसते; परंतु स्वतःला “सामाजिक” म्हणवून घेण्याचा त्यांचा उद्देश हा आहे, की ते राजकीय नाहीत असे सूचित करणे. राजकीय असणं म्हणजे सत्तेचा प्रश्न उभा करणं, व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं. मात्र या आंदोलनांना हा प्रश्न उपस्थित करायचा नाही. आज 'नवीन सामाजिक चळवळी' आणि अस्मितेचे राजकारण असा नारा बुलंद करणाऱ्या सर्व एन.जी.ओ. आणि त्यांनी पुरस्कृत केलेल्या संघटना आणि चळवळी तेच करत आहेत. ते सत्ता आणि व्यवस्थेचा प्रश्न संघर्षाच्या कक्षेतून गायब करतात. भांडवलदार वर्गाला कधीच गोत्यात उभे केले जात नाही. शत्रू कोण हे सांगितले जात नाही, कोणाशी लढायचे आहे हे सांगितले जात नाही. सरकारकडे बोट दाखवणे चुकीचे आहे असे म्हटले जाते आणि लोकांचा पुढाकार, तळागाळातून पुढाकार इत्यादी मूलगामी वाक्प्रचार वापरून, प्रत्येक समस्या आणि दुःखासाठी लोकांना जबाबदार धरले जाते.

हा पोस्टमॉडर्न (आधुनिकोत्तर विचार) अजेंड्याचा भाग आहे. आधुनिकोत्तर विचारांचे प्रमुख विचारवंत मिशेल फुकॉल्ट यांच्या मते, सत्ता प्रत्येक घटकांच्या सांध्यात (knuckle) अंतर्भूत आहे आणि विकेंद्रित आहे. ती दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये झिरपते आणि लोक त्यात अंतर्भूत असतात. त्याचा प्रतिकार करता येत नाही कारण सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असलेला कोणताही प्रभावी सामूहिक प्रतिकार ‘सत्तेचे नवीन रूप' निर्माण करतो. 

"मार्क्सवादोत्तर" विचारवंत लॅक्लाऊ आणि मॉफ यांनी अस्मितावादाचा विचार मांडला, त्यांच्या मते, प्रत्येक प्रकारची दडपशाही व्यक्तिनिष्ठ असते. त्याचा वस्तुनिष्ठ वास्तवाशी, अत्याचाराच्या ठोस अमानवीयतेशी काहीही संबंध नाही. एकूणच, ही विचारसरणी शोषण आणि अत्याचाराविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या व्यापक संयुक्त चळवळीची शक्यता नाकारते.

 बहुसंख्य हिंदुत्वाच्या फॅसिस्ट राजकारणाचा उदय हा खरे तर अस्मितेच्या राजकारणाची अभिव्यक्ती आहे. भारताच्या बाबतीत हे हिंदू अस्मितेच्या आदर्शावर अवलंबून आहे आणि मिथकांना वास्तववादी आणि सामान्य समज (कॉमन सेंस) बनवून या अस्मितेसाठी वैध मूल्य प्राप्त करते. त्याचप्रमाणे जातीवर आधारित राजकारण हे देखील आज अस्मितेचे राजकारण आहे. सवर्ण राजकारण आणि दलित राजकारण हे दोन्ही अस्मितेच्या राजकारणाची अभिव्यक्ती आहेत.

दलितांच्या अस्मितेभोवती दलित संघटनांनी केलेले राजकारण अस्मितेच्या राजकारणाचा अजेंडा पूर्ण करत आहे, जरी त्यामागे दलित मुक्तीची खरी इच्छा आणि हेतू असला तरीही. कोणत्याही अस्मितेवर आधारित राजकारण किंवा संघटनेत समाजमुक्तीचा व्यापक प्रकल्प असू शकत नाही. विविध संघटित समुदाय आपापल्या ओळखीं (Identity) वर लढत राहू शकतात परंतु कधीही जिंकू शकत नाहीत. याउलट हे राजकारण व्यापक एकात्मता निर्माण करण्याऐवजी अधिक संकुचित अस्मितेच्या आधारे विघटनाला प्रोत्साहन देते, त्याची अनेक उदाहरणे आज आपल्यासमोर दिसत आहेत.

मार्क्सवाद, विविध अस्मितेचे वास्तव आणि अस्मितेवर आधारित दडपशाहीचे वास्तव स्पष्ट करू शकत नाही आणि वर्गाच्या साच्यात जबरदस्तीने समस्यांना बसवून सर्वकाही पाहतो, हा मार्क्सवादावरील आरोप निराधार आहे. भारतातील अनेक मार्क्सवाद्यांनी वर्गवादी (क्लास रिडक्शनिस्ट) पद्धतीने गोष्टी पाहिल्या, त्यामुळे ही त्यांची समस्या आहे, मार्क्सवादी पद्धतीची नाही. हेच लोक आता पेंडुलमच्या दुसऱ्या टोकाला गेले आहेत आणि वर्गीय विश्लेषण विसरून अस्मिता विचारसरणीला शरण गेले आहेत. मार्क्सवाद सर्व अस्मिता-आधारित दडपशाहीचे वास्तव स्वीकारतो आणि वर्ग-आधारित शोषण मूलभूत मानतो. तसेच आर्थिक शोषणासह सर्व प्रकारच्या दडपशाहीला वर्ग संघर्षाचा, म्हणजे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचा मुद्दा मानतो.

(सत्यम वर्मा यांच्या हिंदी लेखावरून धनंजय आदित्य यांनी मराठीत केलेले भाषांतर. या लेखात काही वेगळे व मुलभूत मुद्दे आले आहेत म्हणून त्यावर विचार व चर्चा करण्यासाठी वरील भाषांतर केले आहे. कोणताही ism रेटण्यासाठी नाही.) 



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

अमेझॉन चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन': पाहायलाच हवा असा अप्रतिम चित्रपट

बाबा वेंगा यांच्या खोट्या भविष्यवाण्या