'गळी टुपणे' - हा दैवी चमत्कार नव्हेच!

१७ एप्रिल १९९९

'या जगातील कोणतेही चमत्कार हे दैवी नसतात. चमत्कार म्हणून गाजावाजा झालेल्या प्रत्येक घटनेमागे कोणते ना कोणते शास्त्रीय व भौतिक कारण असतेच. अशा तथाकथित चमत्कारांची खरी कारणे आपण समजून घेतली पाहिजेत आणि अंधश्रद्धाळू लोकांना समजावून दिली पाहिजेत.' फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन्सचे अध्यक्ष बी. प्रेमानंद तळमळीने बोलत होते. धर्मनिरपेक्ष मानवतावाद्यांच्या १४ व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात विविध देशांतून आलेले प्रतिनिधी त्यांचा शब्द न् शब्द अंतःकरणात साठवून ठेवत होते. या वेळी बी. प्रेमानंद व त्यांचे सहकारी विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखवून त्यामागील शास्त्रीय कारणांचे स्पष्टीकरणही देत होते.

थोड्याच वेळात केरळ रॅशनलिस्ट असोसिएशन व तामीळनाडू रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी शर्ट व बनियन काढले. सर्वांची उत्सुकता ताणली गेली. पाठीत गळ खुपसून करण्यात येणाऱ्या चमत्कारांची प्रात्यक्षिके ते करून दाखवणार होते. प्रथम त्यांच्या छातीच्या व पोटाच्या त्वचेत सुई खुपसून दोऱ्याने ८-९ लिंबे शिवून लटकवण्यात आली. तसेच नास्तिकवादाचा पुरस्कर्ता पेरियार रामास्वामी यांचे छायाचित्रही त्याच प्रकारे शिवून लटकवण्यात आले. नंतर त्यांच्या पाठीवर थापा मारून त्यांची पाठ मळण्यात आली. अंगठा व त्याच्याजवळील बोटाने त्यांच्या पाठीची चामडी घट्ट पकडून ताणून खेचण्यात आली. ३ इंच लांबीचे व १ इंच रुंदीचे इंग्रजी यू आकाराचे दोन लोखंडी गळ त्या चामडीत टोचून आरपार काढण्यात आले. गळ टोचताना कार्यकतें थरथरत नव्हते. तसेच त्यांना वेदना झाल्याचेही दिसत नव्हते आणि त्यांच्या पाठीवर रक्तही दिसत नव्हते. नंतर जोराने खेचून गळ व्यवस्थित खुपसला असल्याची खात्री करून घेण्यात आली.

तेथील पटांगणात सुमारे १४-१५ फूट उंचीचा लोखंडी खांब उभारलेला होता. त्यावर आडवी १-१० फूट लांबीची जाडसर लोखंडी कांब वर्तुळाकार फिरू शकेल अशी बसवलेली होती. त्याच्या टोकाच्या लोखंडी कडीत दोरखंड बांधलेले होते. ते कार्यकर्त्यांच्या पाठीत रोवलेल्या लोखंडी गळांना बांधण्यात आले आणि नंतर गळ खुपसलेल्या चामडीच्या आधारावर अधांतरी लटकवलेल्या कार्यकर्त्यांना गरागरा फिरवण्यात आले.

यानंतर कार्यकर्ते खाली उतरले. समोर रस्त्यावर तयार ठेवलेल्या एम. एच. ०४- ए. सी-२४०९ या क्रमांकाच्या मारुती गाडीला दोर बांधून ते कार्यकर्त्यांच्या पाठीत टोचलेल्या गळाला बांधण्यात आले. 'पेरियार रामास्वामी झिंदाबाद, रॅशनॅलिस्ट मुव्हमेंट लॉग लिव्ह' अशा घोषणा देत ते गळ खुपसलेल्या चामडीच्या जोरावर रस्त्यावरून ती गाडी खेचू लागले. काही अंतर नेऊन, ती वळवून त्यांनी पुन्हा मूळ जागेवर परत आणली. नंतर त्यांच्या पाठीतून ते गळ काढून घेण्यात आले. जखमा पुसून घेण्यात आल्या. त्यांनी कपडे घातले व ते पुढील कार्यक्रम पाहू लागले. या सर्व प्रात्यक्षिकाच्या वेळेस कोणालाही घेरी आली नाही. प्रत्येकजण काळजीपूर्वक एकेका बारकाव्याचे निरीक्षण करीत होता. काहीजण फोटो काढत होते, तर काहीजण व्हिडीओ शूटिंग करीत होते.

ही घटना अधिवेशनात पार पडते, तेव्हा सर्वजण बुद्धीची कवाडे उघडी ठेवून ती एक शास्त्रीय भौतिक घटना म्हणून तिची नोंद घेतात. परंतु अशीच घटना श्रीवर्धनजवळील दिवेआगार येथील श्री सिद्धनाथ भैरव व श्री केदारनाथ भैरव या देवस्थानात पार पडते तेव्हा तेथील लोक तो एक दैवी चमत्कार समजतात, हात जोडून माना डोलावतात, तेथील देवाला नवस बोलतात! ही घटना म्हणजे चमत्कार मुळीच नव्हे; पण विज्ञानाची कास धरून एकविसाव्या शतकाकडे जाताना अशा प्रकारांना दैवी चमत्कार समजणे व माना डोलावणे हाच मोठा चमत्कार मानला पाहिजे. दै. लोकसत्तामधील ३ एप्रिल ९९ च्या चतुरंग पुरवणीतील 'गळी टुपणे - एक दैवी चमत्कार' हा उदय कळस यांचा लेख वाचून वरील सर्व कसे भराभर एखाद्या चित्रपटासारखे जाणवून गेले.

खरे तर श्रीलंका रॅशनॅलिस्ट असोसिएशनते अध्यक्ष डॉ. अब्राहम कोवूर आणि उपाध्यक्ष श्रीलंका मेडिकल फैकल्टीचे प्राध्यापक डॉ. कार्लो फोन्सेका यांनी २८ वर्षांपूर्वी ऑगस्ट १९७१ मध्ये या तथाकथित दैवी चमत्काराचा रहस्यभेद केला होता. त्या वेळी एन. सी. जयसूर्या कार्यकर्त्याने लोखंडी गळ पाठीमध्ये खुपसून लटकण्याचे प्रयोग विविध ठिकाणी करून दाखविले होते. तो निरीश्वरवादी असूनही त्याच्यावर कोणताही विपरित परिणाम झाला नव्हता. त्यानंतर केरळ, तामीळनाडू, पंजाब, हरयाणा, कर्नाटक इत्यादी राज्यांतील रॅशनलिस्ट असोसिएशन्स, अंधश्रद्धा निर्मूलन समिती इत्यादी संघटनांनी अशा चमत्कारांची प्रात्यक्षिके विविध ठिकाणी सादर केली. तरीही प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सदर गळी टुपण्याचा प्रकार हा दैवी चमत्कार म्हणून अजूनही गणण्यात येतो, ही अत्यंत खेदाची गोष्ट होय. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवण्याचे, जनजागृतीचे कार्य अजूनही किती अपुरे राहिले आहे, याचीही यावरून कल्पना येते.

शरीराचा एखादा भाग कापणे, चिरणे, पोसकणे, जाळणे अशा प्रकारांविषयी आपणांस साहजिकच भीती वाटत असते. तसेच हे प्रकार म्हणजे दुःख व वेदना देणारे, हानी व नुकसान करणारे समजले जातात. लोकांच्या अशा भावनांना अशा चमत्कारांमध्ये वेठीस पकडण्यात येते. समोरील व्यक्तीवर कापणे, जाळणे, भोसकणे यांचा विपरित किंवा हानीकारक परिणाम होत नाही, हा दैवी चमत्कार असल्याचे भासविण्यात येते. दैवी चमत्कार असतात, असा अंधविश्वास बाळगणाऱ्यांना मग ते खरेही वाटते. असे चमत्कार होत असतील तर त्या तथाकथित दैवी शक्तीने युद्ध, दंगली, अपघात अशा प्रसंगी ते का करू नयेत? म्हणजे विविध प्रकारचे नुकसान व वेदना टाळल्या जातील.

शरीरात लोखंडी गुळ खुपसल्याने व त्याच्या जोरावर लटकण्याने दुःख व यातना का होत नाहीत, असा प्रश्न या वेळी लोकांना पडतो. यातनेची संवेदना व यातनेची प्रतिक्रिया या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यातनेची तीव्रता ही संवेदनेपेक्षा तिच्या प्रतिक्रियेवर ठरत असते. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना यातनांची तीव्रता अपघातातील माणसांइतकी जाणवत नाही. एखाद्या कार्यात गुंग असताना झालेल्या जखमेच्या वेदना जाणवत नसल्याचा अनुभव आपल्यालाही कधी ना कधी आलेला असतो. वेदनेच्या विरोधातील जाणीव जितकी प्रखर असेल तितकी वेदना कमी जाणवते. गळ खुपसण्याच्या प्रयोगात कार्यकर्ता किंवा भक्त हा इतका प्रभावित झालेला असतो की त्याला शारीरिक वेदना होत नाहीत. याचाच अर्थ त्याच्या वेदनेच्या संवेदनांची भावनिक प्रतिक्रिया शुन्य असते, तसेच पाठीवर थापा मारणे, त्वचा ताणणे अशा क्रियांमुळे तेथील चेतातंतूंची बधीरता वाढते. यामुळेही वेदना जाणवण्यात अडथळा निर्माण होतो.

साधा काटा किंवा सुई टोचली तरी रक्त येते, पण एवढा मोठा गळ टोचूनही रक्त कसे येत नाही, हाही लोकांच्या आश्चर्याचा एक प्रश्न असतो. येथे रक्तस्त्राव न होण्यामागे कोणतेही दैवी कारण नसते. वेगवेगळ्या तीन नैसर्गिक कारणांनी रक्तस्त्राव थांबवला जातो. शरीरात अॅड्रेनल मेड्युला नावाच्या ग्रंथीतून अॅड्रेनेलिन हे हार्मोन स्रवत असते. या द्रवामुळे आकडा खुपसताना तेथील रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते. त्यामुळे रक्तस्त्रावास विरोध होतो. दुसरे म्हणजे रक्तस्त्राव होऊ लागल्यास रक्त गोठवणारे रसायन त्वरित तयार होते. त्यामुळे बाहेर आलेले रक्त जखमेवर गोठायला लागते. तिसरे कारण म्हणजे गळ चामडीत खुपसण्यापूर्वी शरीराच्या त्या भागावर निर्माण केलेला दाब व ताण. यासाठी पाठीवर थापा मारणे, मळणे या क्रिया करतात, त्यानंतर शरीराचा तो भाग बोटांच्या चिमटीत धरून घट्ट पकडलेली चामडी ताणून ओढतात. या प्रकारे ताणल्याने तेथील रक्तप्रवाहास अडथळा निर्माण होतो. त्यानंतर मग गळ टोचतात. कातडे ताणून गळ टोचल्यामुळे गळावर कातडे व मांस घट्ट बसते. त्यामुळेही रक्तस्रावास विरोध होतो. म्हणून पाठीवर रक्त न दिसणे ही दैवी बाब समजण्यास काहीएक अर्थ नाही.

हा प्रयोग पाहताना इतरांना घेरी येते, पण भक्तास भोवळ येत नाही, मानसिक धक्का पोहोचत नाही, यातही दैवी चमत्कार मुळीच नाही. आपण ज्या गोष्टीस तयार नसतो, अशी भयानक गोष्ट अचानक व अनपेक्षितपणे समोर घडल्यास आपल्याला मानसिक धक्का बसतो. भोवळ, चक्कर, घेरी येण्यासारख्या प्रतिक्रिया ही मानसिक धक्क्याचीच रूपे होत. येथे भक्त किंवा कार्यकर्ता स्वतःच्याच इच्छेने प्रस्तुत कार्य करीत असतो, त्याची त्यास तयारी असते व संभाव्य परिणामांची माहितीही असते. त्यामुळे त्याला तेथे अनपेक्षित असे काहीच नसते. म्हणून त्याच्यावर विपरित मानसिक प्रतिक्रिया दिसत नाही.

शरीरात गळ टोचूनही धनुर्वात वा इतर जंतुसंसर्ग कसा होत नाही, याचेही लोकांना आश्चर्य वाटते. त्यास ईश्वरी कृपेचे लक्षणही मानण्यात येते. श्रीलंका रॅशनॅलिस्ट असोसिएशनतर्फे केलेल्या पाहणीत काही भक्तांच्या जखमा चिघळतात व नंतर औषधोपचार वगैरेमुळे बऱ्या होतात असे आढळले आहे. तसेच टोचायचे आकडे शक्य तितके स्वच्छ केलेले असतात. तसेच धनुर्वातासारखे दुर्मिळ रोग एरवीही क्वचितच होत असतात. एरवीही जखमा होणाऱ्या कित्येकांनाही धनुर्वातासारखे रोग होत नाहीत हे आपण पाहतोच. तसेच रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर जंतुसंसर्गावरही मात केली जाते. गळ टोचून घेणारे शरीरानेही सुदृढच असतात. त्यामुळे त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्तीही चांगली असते.

एवढा वजनी देह लोखंडी गळाला लटकूनही तो भक्ताची पाठ फाडून बाहेर कसा येत नाही, याचेही लोकांना मोठे आश्चर्य वाटते. परंतु यामध्येसुद्धा कोणतेही दैवी कारण नाही. आपल्या त्वचेचे तीन स्तर असतात. सर्वात बाहेरच्या एपिडर्मिस या स्तरात सुई खुपसल्यास रक्त येत नाही व हा स्तर ५०० ग्रॅमपर्यंत वजन उचलू शकतो. त्वचेला लिंबू, सफरचंद, इत्यादी लटकवण्याचा प्रकार यामुळे घडतो. त्वचेच्या तीनही स्तरांचा उपयोग केल्यास एकूण ८० किलो वजन उचलता येऊ शकते. दोन गळ वापरल्यामुळे १६० किलो वजन लटकवण्याची क्षमता प्राप्त होते. परंतु वास्तविकतः लटकणाऱ्या व्यक्तीचे वजन या क्षमतेच्या निम्म्याहून कमीच असते. त्यामुळे त्यात आश्चर्याचे कोणतेही कारण नाही.

वस्तुस्थिती अशी असली तरी अशा प्रकारचे प्रयोग करून ते दैवी चमत्कार या नावावर खपवण्यात येतात. मध्यंतरी एका कुंभ मेळ्यात एक नागा साधू त्याच्या लिगाला ३५ किलोचा दगड लटकवून फिरत होता. खरे तर ८० किलोच्या क्षमतेपेक्षा ते वजन खूपच कमी होते. कर्नाटकात लग्नातील गुग्गळा या प्रथेत महारुद्र अंगात येण्याचे नाटक करून जिभेत, गालात तांब्याची तार खुपसतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शब्बीरभाई शेख व इतर कार्यकर्तेही असा प्रयोग करून दाखवतात. कर्नाटकातील हंपी-चित्रदुर्ग भागातील हनुमानाच्या देवळातील पुजारी टोकदार खिळ्यांच्या पाट्यावर पालखीत झोपतो. त्याच्या अंगातून रक्त येत नाही हा चमत्कार मानतात. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १९९५ मध्ये काढलेल्या लोकजागर यात्रेत हाच प्रयोग ठिकठिकाणी करून दाखविण्यात आला होता.

याचप्रमाणे दिवेआगारातील 'गळी टुपणे' हा प्रकारही दैवी चमत्कारांच्या नावावर खपवणे हा अंधश्रद्धा वा बुवाबाजीचाच प्रकार होय. भोळ्याभाबड्या जनतेला अधिक अंधश्रद्धाळू बनविण्याचे कार्य मात्र यामुळे साधले जाते. असे प्रयोग दैवी चमत्काराच्या नावावर कोणत्याही देवस्थानामध्ये जाहीरपणे मुळीच चालू नयेत, तसेच जनतेने व शासनानेही ते चालू देऊ नयेत.

• धनंजय आदित्य

(प्रस्तुत लेख दैनिक लोकसत्ताच्या चतुरंग या शनिवार पुरवणीत १७ एप्रिल १९९९ रोजी प्रकाशित झाला होता.)
=== 0 ===

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

अमेझॉन चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन': पाहायलाच हवा असा अप्रतिम चित्रपट

बाबा वेंगा यांच्या खोट्या भविष्यवाण्या