पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)
![]() |
Pixhere |
आजच्या काळात पर्यावरणीय समस्यांमुळे पर्यावरण आणि पारिस्थितिकी या दोन संकल्पनांबद्दल जागरूकता वाढली आहे. आपण जेव्हा पर्यावरणाबद्दल बोलतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात पारिस्थितिकीय संतुलन बिघडण्याबद्दल बोलत असतो. पर्यावरण आणि पारिस्थितिकी या दोन संकल्पनांमध्ये अनेकदा गोंधळ होतो. पण प्रत्यक्षात या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण फरक आहे.
पर्यावरण (Environment) ही व्यापक संकल्पना आहे. पर्यावरण हे आपल्या सभोवतालचे सर्व काही आहे. यात जैविक (सर्व सजीव) आणि अजैविक (हवा, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटक दोन्ही समाविष्ट आहेत. यात निसर्ग, मानवनिर्मित वातावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक हे घटकही समाविष्ट असतात. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती, ज्यात आपण राहतो, काम करतो आणि खेळतो.
पारिस्थितिकी (Ecology) ही विज्ञानाची, जीवशास्त्राची एक शाखा आहे. या शाखेत सजीवांचा एकमेकांशी तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध यांचा अभ्यास आणि विश्लेषण केले जाते. पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते, त्यास परिसंस्था (Ecosystem) असे म्हणतात.
या दोन संकल्पनामध्ये दोघांमध्ये महत्वाचा फरक आहे.पर्यावरण हा एक व्यापक शब्द आहे, तर पारिस्थितिकी ही एक शास्त्रीय संकल्पना आहे. पर्यावरण हा सर्वसमावेशक शब्द असून त्यात सर्व प्रकारचे घटक समाविष्ट असतात, तर पारिस्थितिकी ही सजीवांच्या परस्परसंवादाचा अभ्यास करते. पर्यावरण हा एक स्थिर नसून सतत बदलणारा घटक आहे, तर पारिस्थितिकी ही या बदलांचे वैज्ञानिक विश्लेषण करते.
याच्या उदाहरणादाखल एक जंगल घेऊ या. जंगल हे पर्यावरणाचा एक भाग आहे. या जंगलात असलेले सर्व वृक्ष, प्राणी, कीटक, सूर्यप्रकाश, पाणी, माती इ. सर्व मिळून एक परिसंस्था बनते. पारिस्थितिकी या जंगलातील सर्व सजीवांच्या एकमेकांशी आणि त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करते.
===X===