प्रकाशाच्या प्रदूषणामुळे जागतिक पर्यावरण धोक्यात!

World in Light Pollution. Photo- Flicker

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गावाबाहेरील झाडाझुडपांवर मे-जून या महिन्यात रात्रीच्या वेळी काजव्यांचा लखलखाट सहज बघायला मिळायचा. इतकेच नव्हे तर, घराच्या अंगणातील झाडावरही काजवे त्यांचे दर्शन देऊन जायचे. निसर्गातील माणसांच्या हस्तक्षेपामुळे काजवे लोकवस्तीपासून दूर जायला लागले. मग काजवे बघण्यासाठी पर्यटन उद्योगाने खास “काजवा महोत्सव” सुरू केले. हजारो- लाखोंच्या संख्येने पर्यटक काजवा महोत्सवासाठी काजव्यांच्या निवासस्थानी एक-दोन रात्रीची वस्ती करून राहायला लागले. राहण्यासाठी तंबू, विजेचे दिवे, मोबाईलचे फ्लॅश, बॅटरीचे झोत, कॅमेऱ्याचे फ्लॅश, व्यवसायिक फोटोग्राफर, पर्यटकांच्या गाड्यांचे झगझगीत दिवे इत्यादींच्या प्रकाशाच्या प्रदूषणाने काजव्यांच्या आयुष्यावर परिणाम केला आणि काजवा महोत्सवापासून काजवे दूर जायला लागले.

काजव्यांच्या व बारीक-सारीक जीवांच्या जीवनावर मानवनिर्मित प्रकाशाच्या प्रदूषणाने कसा विपरीत परिणाम होतो, याचे हे जिवंत उदाहरण होय. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण, किरणोत्साराचे प्रदूषण इत्यादी प्रदूषणे आपल्याला माहीत आहेत. परंतु पृथ्वीवरील सजीवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे प्रकाशाचे प्रदूषण (light pollution) याकडे आपण अजूनही गंभीरणे लक्ष दिलेले नाही. प्रकाश-प्रदूषण ही अशी समस्या आहे ज्याचा मानवी जीवनावर, आरोग्यावर किंवा पर्यावरणावर तात्काळ परिणाम होत नाही, परंतु दीर्घकाळात त्याचा आपल्यावर आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणावर मोठा परिणाम होत असतो. प्रकाश-प्रदूषणाचा परिणाम मानवापेक्षा प्राणी, पक्षी, वनस्पती आणि आपल्या परिसंस्थेवर अधिक होतो.

प्रकाश-प्रदूषण म्हणजे कृत्रिम प्रकाशाचे अतिक्रमण. प्रकाशाचे प्रदूषण म्हणजे अनावश्यक, अयोग्य किंवा जास्त अशा कृत्रिम प्रकाशाचे अस्तित्व. विद्युत उपकरणांद्वारे सोडल्या जाणाऱ्या प्रकाशाची तीव्रता आणि व्याप्ती, जेव्हा पर्यावरण व सजीवांच्या (प्राणी, पक्षी, वनस्पती) आरोग्याला घातक होते, तेव्हा त्याला प्रकाश प्रदूषण म्हटले जाते. त्याला ल्यूमिनस प्रदूषण (luminous pollution) किंवा फोटो प्रदूषण (photo pollution) असेही म्हणतात. प्रकाशाचे प्रदूषण चार मुख्य प्रकारचे असते:

आकाशाची चमक (Sky glow)- शहरांमधील आकाश रात्री प्रकाशमुळे उजळलेले असते, ज्यामुळे तारका किंवा ग्रह दिसणे कठीण होते. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी अनावश्यक प्रकाशाचा वापर केला जातो. यामुळे रात्रीचे वातावरण बदलते आणि अनेक समस्या निर्माण होतात. या प्रकारच्या प्रकाश प्रदूषणामुळे आकाश निरभ्र असले तरी अमावस्येच्या रात्री देखील आकाशातील तारे, ग्रह व आकाशगंगा आपल्याला स्पष्टपणे दिसत नाहीत किंवा धुरकट दिसतात. रस्त्यावरील दिवे, इमारतीवरील प्रकाश, वाहनांवरील दिवे आणि जाहिरातींचे फलक इत्यादींचा प्रकाश प्रदूषण वाढवतो.

ग्लेअर (Glare)- अत्यंत तेजस्वी प्रकाशामुळे दृष्टीवर होणारा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी त्रास. कारण समोरच्या वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे आपले डोळे दिपतात. त्यामुळे पुढून येणा-या वाहनांचा अंदाज येत नाही तसेच रस्ताही दिसत नाही. अनेक वाहने नको तेवढा प्रकाश फेकत असतात. या प्रकारामुळे बरेच अपघात होत असतात.

प्रकाशाचे आक्रमण (Light Trespass)- एखाद्या क्षेत्राचा प्रकाश अनपेक्षित किंवा अनावश्यक ठिकाणी पोहोचतो, जसे की आपल्या घरातील तीव्र प्रकाश खिडक्यांमधून शेजाऱ्याच्या घरात, अंगणात पोचतो.

क्लटर (Clutter):- अनेक आणि अनियंत्रित प्रकाश स्रोतांमुळे निर्माण होणारा प्रकाशाचा गोंधळून टाकणारा पुंजका. यामुळे दृष्टीदोष आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

सर्वप्रथम प्रकाश प्रदूषणाची जाणीव खगोलशास्त्रज्ञांना आणि हौशी खगोलप्रेमींना झाली. प्रकाशाच्या प्रदूषणामुळे खगोलशास्त्रीय निरीक्षण करणे कठीण होते, हे त्यांना लक्षात आले. अवकाशातील ग्रह गोलांचा अभ्यास करताना धुळीच्या ढगाबरोबर क्षितिजापासून वर पसरलेल्या रात्रीच्या अधिक प्रकाशाने तारे दिसत नाहीत किंवा नीट दिसत नाहीत, हे त्यांना जाणवले. यामुळे ते बेचैन झाले. यामधून १९८० च्या दशकात ‘डार्क स्काय मुव्हमेंट’ चालू झाली. १९८८ साली International Dark Sky Assosiation (IDA) ही प्रकाश प्रदूषणाचा शास्त्रीय अभ्यास करणारी संस्था स्थापन झाली. जगातील ८३ टक्के लोक प्रकाशाच्या प्रदूषणात राहतात असा एक अंदाज आहे. ‘आकाशाचा चकचकाट’ (Sky Glow) हा २०१७ मध्ये पृथ्वीच्या ४९ टक्के भूभागावर पसरल्याची नोंद झाली आहे.

आमच्या लहानपणी म्हणजे सातव्या आठव्या दशकात रात्रीचे जेवण आटोपले की अंगणामध्ये खाटा टाकायच्या व त्यावर आकाशाकडे बघत आडवे व्हायचे. त्यानंतर आकाशातील ग्रह गोल ओळखायचे, त्यांच्याविषयी चर्चा करायची, अशी खरोखर मज्जा होती. आज प्रकाशाच्या प्रदूषणामुळे पृथ्वीवरच्या मानवी वस्ती असलेल्या भागापैकी दोन तृतीयांश भागातून आकाशगंगा दिसत नाही. काळोख्या रात्री उघड्या डोळ्यांनी आकाशात आकाशगंगेचा पट्टा दिसतो की नाही हा प्रकाशाचे प्रदूषण ओळखण्याचा मूलभूत निकष आहे. आकाशातले ताऱ्यांचं विश्व दिसू शकेल असं रात्रीचं निरभ्र आकाश युरोपात सापडणं अशक्य झालं आहे.

अनिर्बंध वाढणारे शहरीकरण व चंगळवाद ही प्रकाशाच्या प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. प्रकाश प्रदूषण हा औद्योगिक युगाचा व नव्या असमतोल संस्कृतीचा दुष्परिणाम आहे. प्रकाशाच्या अतिवापराला हायपर-ल्युमिनेसेन्स म्हणतात. रात्रभराची वाहतूक व वाहनांचे प्रखर प्रकाशाचे दिवे, रात्रीचे चकचकीत व पांढराशुभ्र प्रकाश असलेले आणि बारा तासांपेक्षा जास्त लागलेले रस्त्यावरचे दिवे, विविध उत्पादनांच्या व दुकानांच्या जाहिराती करणारे मोठे मोठे फलक, उंच इमारतींना, विशेषतः हॉटेल्स यांना केलेली प्रकाशाची रोषणाई, नदी, तलाव, आणि समुद्राकाठी असलेल्या हॉटेल व इतर व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केलेली विजेची रोषणाई इत्यादी कारणांमुळे प्रकाशाचे प्रदूषण वाढत आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये सार्वजनिक दिवे हे ग्रीन हाऊस वायू निर्माण होण्याचे एक मोठे कारण आहे. तेथे २० लाख सार्वजनिक दिवे आहेत. हे प्रमाण दर १० ऑस्ट्रेलियन नागरिकांमागे १ दिवा असे आहे. यात विजेचा प्रचंड वापर आणि त्याच प्रमाणात वीज निर्मितीतून कार्बन डायऑक्साइड वायूची निर्मिती यामुळे होते. इमारतीवर रात्री रोषणाईसाठी सोडलेले तीव्र प्रकाशाचे झोत, इमारतीच्या खिडक्यांमधून बाहेर येणारा प्रकाश, रात्री खेळांचे सामने भरवताना प्रखर प्रकाशझोतांचा वापर, यामुळे प्रकाश प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.

तीव्र प्रकाशामध्ये काम करण्याचे अनेक वैद्यकीय वाईट परिणाम आहेत. त्यामुळे रक्तदाब वाढतो. थकवा, ताण, चिंता (अँग्झायटी) असे विकार वाढतात. तसेच रात्री काम करणाऱ्या व्यक्तींची कार्यक्षमता घटते. काही कर्करोगाचे एक कारण रात्रीचा कृत्रिम प्रकाश सुद्धा असू शकतो. गडद अंधारात आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाच्या संप्रेरकाची निर्मिती शक्य असते. मेलाटोनिनमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे, आपली प्रतिकारशक्ती वाढवणे, तसेच निरोगी शरीरासाठी महत्त्वाची इतर काही कार्ये केली जातात. कृत्रिम प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे डोळ्यांचे आणि मेंदूचे विकार, मानसिक अस्थिरता असे वाईट परिणाम संभवतात. अंधारात किंवा कमी प्रकाशात पाहतांना आपल्या डोळ्यातील रॉड्स या प्रकाशसंवेदी पेशी कार्य करतात. चांगल्या व तीव्र प्रकाशात आपल्या डोळ्यातील कोन्स या प्रकाशसंवेदी पेशी कार्य करतात. जेव्हा आपण प्रकाशात गोष्टी पाहतो तेव्हा आपले डोळे शंकूच्या दृष्टीचा वापर करतात आणि जेव्हा आपण अंधारात पाहतो तेव्हा आपले डोळे रॉड दृष्टीचा वापर करतात. चकचकीत प्रकाशात राहणारे लोक रॉड व्हिजन वापरत नाहीत. त्यामुळे शंकू पेशीचे काम करणे हळूहळू कमी होत आहे. म्हणजेच रात्री पाहण्याची डोळ्यांची क्षमता कमी होत असून येणाऱ्या काळात माणसाला अंधारातही पाहता येणार नाही.

प्रकाशाच्या प्रदूषणामुळे पक्षी-प्राणी यांच्यावरही विपरीत परिणाम होतात. रात्री फिरणारे प्राणी- पक्षी प्रखर प्रकाशाने गोंधळतात. त्यांचे जैविक चक्र दिवस आणि रात्र यांच्या क्रमावर आधारित असते. निशाचर कीटक परागीकरण्याच्या प्रक्रियेत मदत करतात, पण या कीटकांना कृत्रिम प्रकाश अडथळा ठरतो. रात्री उमलणा-या काही फुलांचे परागीभवन पतंगामुळे होते. परंतु रात्रीच्या प्रखर उजेडात पतंगांना फुले नीटशी दिसत नाहीत. फुलांचे परागीभवन नीट झाले नाही तर त्या वनस्पतींची संख्या घटते. कीटक हा अन्नसाखळीतील सर्वात महत्वाचा घटक होय. प्रकाशाच्या प्रदूषणामुळे जंगली भागातील कीटक प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्यांची संख्या कमी होते.

प्राणी, पक्षी, कीटक यांचा दिनक्रम सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार ठरतो. प्रकाशाच्या प्रदूषणामुळे दिवस आणि रात्र यांच्यातला फरकाबद्दल त्यांचा गोंधळ उडतो. काही प्राणी दिवसा झोपतात आणि रात्री शिकारीला बाहेर पडतात. अशा प्राण्यांचे प्रकाशाच्या प्रदूषणामुळे जीवनचक्र बिघडते. बेडकांसारखे प्राणी रात्र झाली की मोठ्याने ओरडतात. तो त्यांच्या प्रजोत्पादन प्रक्रियेचा एक भाग असू शकतो. कृत्रिम प्रकाशामुळे बेडूक ओरडत नाहीत. स्थलांतर करणारे अनेक पक्षी चंद्र आणि ताऱ्यांच्या प्रकाशाच्या संदर्भाने प्रवास करत असतात. प्रकाश प्रदूषणामुळे या पक्ष्यांची दिशाभूल होते. यावर्षी 2024 मध्ये एप्रिल या महिन्यात नवी मुंबईतील नेरूळ येथे प्रकाशाच्या प्रदूषणामुळे मोठ्या साईन बोर्डवर आदळून किमान दहा फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता.

समुद्री कासवं रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. सामान्य नैसर्गिक परिस्थितीत समुद्री कासवाच्या अंड्यातून बाहेर पडलेली पिले थेट समुद्राकडे चालायला लागतात. पण शहरातील दिव्यांच्या प्रकाशाने आकर्षित होऊन ती पिले भलत्याच दिशेने निघून जातात व काही मरूनही जातात. फ्लोरिडामध्ये हजारो कासवांची पिले या कारणामुळे मृत्यू पावल्याचे आढळले आहे.

काही पक्षी रात्री स्थलांतर करतात. उंच इमारतीतून येणाऱ्या व परावर्तीत होणाऱ्या प्रकाशामुळे असे पक्षी गोंधळून भलत्याच ठिकाणी जातात. यामुळे दरवर्षी लाखो पक्षी मरण पावतात. हे पक्षी पिकावरील उपद्रवी कीटकांना खातात व आपल्याला मदत करतात. प्रकाश प्रदूषणामुळे मानव, झाडं, वनस्पती, वेली, प्राणी, पक्षी, वन्यजीव यांची परिसंस्था यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रकाश प्रदूषणाचा सभोवतालच्या पर्यावरणावर दूरगामी परिणाम होतो.

विकसित देशांनी ऊर्जासंवर्धक आणि पर्यावरणस्नेही दिव्यांचा प्रस्ताव अंगीकारला आहे. २००७ सालापासून दरवर्षी मार्च महिन्यात शेवटच्या शनिवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळात जगभर 'अर्थ अवर' (earth hour) पाळला जातो. या तासाभाराच्या काळात जागांत सर्वत्र महत्वाच्या ठिकाणी लाईट्स बंद केले जातात. या उपक्रमाची सुरुवात ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून सुरू झाली. या उपक्रमाला जगभर चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे प्रकाशाच्या प्रदूषणाविषयी जागृती सुद्धा होत आहे. प्रकाशाचा अतिरिक्त झगमगाट कमी केल्यास मानवजातीचं भलं होऊ शकेल व त्यासोबतच ऊर्जासंवर्धनही होऊ शकेल.

भारतात प्रकाश-प्रदूषणासाठी समर्पित कायदे आणि नियम सध्या उपलब्ध नाहीत. तथापि, काही सध्याच्या कायद्यांमध्ये आणि नियमानुसार प्रकाश प्रदूषण नियंत्रित करण्याचे प्रयत्न होऊ शकतात.

पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986 (Environmental Protection Act, 1986) या अधिनियमांतर्गत, भारत सरकार विविध पर्यावरणीय प्रदूषणाच्या स्रोतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम आणि मानके निश्चित करू शकते. यामध्ये प्रकाश प्रदूषणाचाही समावेश होऊ शकतो. अनेक शहरे आणि नगरांनी आपल्या नगररचना योजनांमध्ये प्रकाश व्यवस्थापनाचे नियम समाविष्ट केले पाहिजे. यामध्ये बाह्य प्रकाश यंत्रणा आणि स्ट्रीट लाइट्ससाठी विशेष दिशा-निर्देश आणि मानके असू शकतात.

विद्युत ऊर्जा वापर आणि वितरणासाठी भारतीय विद्युत कायदा, 2003 (Indian Electricity Act, 2003) हा कायदा उपयोगी पडू शकतो. ऊर्जा कार्यक्षम लाइटिंग आणि ऊर्जा बचत यंत्रणांचे प्रोत्साहन यामध्ये दिले जाते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे प्रकाश प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येते. काही राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बिल्डिंग कोड्स आणि स्टॅंडर्ड्समध्ये प्रकाश व्यवस्थापनाचे नियम समाविष्ट आहेत. यामध्ये प्रकाशाचे योग्य नियोजन आणि वापर यावर जोर दिला जातो. नवीन विकास प्रकल्पांसाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (Environmental Impact Assessment, EIA) प्रक्रियेमध्ये प्रकाश प्रदूषणाचा विचार केला जातो. विशेषतः मोठ्या औद्योगिक, वाणिज्यिक, आणि निवासी प्रकल्पांसाठी हा विचार आवश्यक आहे.

प्रकाश प्रदूषण नियंत्रणासाठी काही स्थानिक स्तरांवर उपाय आणि जनजागृतीचे प्रयत्न होत आहेत. यूएस मधील बऱ्याच शहरांनी प्रकाशाच्या अतिक्रमणापासून त्यांच्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मैदानी/ उघड्या जागेवरील प्रकाशासाठी मानके विकसित केली आहेत. त्यांना मदत करण्यासाठी, इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनने आदर्श प्रकाश नियम विकसित केले आहेत. काही शहरे ऊर्जा कार्यक्षम स्ट्रीट लाइट्स बसवत आहेत, ज्यामुळे ऊर्जा बचत होते आणि प्रकाश प्रदूषण कमी होते. विविध NGOs आणि पर्यावरणीय संस्थांनी प्रकाश प्रदूषणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जनजागृती अभियाने चालवली आहेत. भारतातील खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रीय संस्थांनी प्रकाश प्रदूषणाविरोधात लढण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि सरकारकडे विशेष कायदे आणि नियमांची मागणी केली आहे.

प्रकाश प्रदूषण हा वाढता पर्यावरणीय धोका आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार प्रकाश प्रदूषणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दर वर्षी सुमारे तीन अब्ज डॉलरचा फटका बसतो आहे. आपल्या देशात प्रकाश प्रदूषणाबाबत पुरेशी जागरूकता नाही. प्रकाश प्रदूषणाकडे जर वेळीच लक्ष नाही दिले, तर त्याचे दुष्परिणाम लवकरच भोगावे लागतील. प्रकाश प्रदूषणाबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. तसेच, शैक्षणिक संस्था, धोरण निर्माते आणि जनता यांनी एकत्रितपणे प्रकाश प्रदूषण आणि पर्यावरणीय बदलांच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाय योजणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने प्रकाशाचा विवेकपूर्ण आणि शाश्वत वापर होणे आवश्यक आहे.

• धनंजय आदित्य.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

बाबा वेंगा यांच्या खोट्या भविष्यवाण्या

पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)