...तरीही मूल का हसतं?

सर्वच शाळांमध्ये कोणालाही निर्विवादपणे मनापासून आवडणारी सर्वांगसुंदर गोष्ट असते ती म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हसू! ते हसू र्निव्याज असतं... उत्स्फुर्त असतं... प्रामाणिक असतं! त्यात दिखाऊपणा नसतो... बनावटगिरी नसते... कोणताही अंतःस्थ विपरित हेतू नसतो! शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या साऱ्यांनाच या स्वर्गीय हास्याची मूर्तीमंत संपत्ती भरभरून मिळत असते. कोणा बालकाला कालपरवा रागावलं, मारलं, कोणाला हिणवलं, दुखावलं... तरीही दिवस पालटल्यावर म्हणा... किंवा घटिका लोटल्यावर म्हणा... पुन्हा ते मूल फुलासारखं टवटवित बनून, आपलं निखळ हास्य घेऊन स्वतःभोवती नंदनवन साकारीत असतं! कोणतंही दुःख असो, वेदना असो, घात असो वा आघात असो, हेवेदावे असो की द्वेषमत्सर असो... साऱ्या किल्मिषांना तत्परतेनं बाजुला सारून मुक्त हास्याची उधळण करण्याची दिव्य कला या बालकांना निसर्गतःच बेमालूमपणे साधलेली असते. जन्मतःच टॅहँऽऽ टॅहँऽऽ चा आलाप करीत, रडत आक्रंदत या मर्त्य जगात प्रवेश करणारा बालक आश्चर्यकारकपणे त्याच्या बालपणात मात्र हास्यानं फुललेलं विशाल हृदय घेऊन मनमुराद जगत असतो! आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे। या ...